विटा तालुक्यातील साळशिंगे रोड लगत असणाऱ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये खानापूर तालुक्यातील मोही येथील तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. याबाबत संबंधित हॉस्पिटल प्रशासनाने विटा पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद केलेली आहे. कुमारी साक्षी गोरख पवार वय 19 असं मयत झालेल्या तरुणीच नाव आहे रविवारी हॉस्पिटलमध्ये कामाला आली होती. दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान ती वरच्या रूम मधून जेवण करून येते असं सांगून गेली होती.
बराच वेळ झाला तरीही साक्षी परत न आल्याने अनेकांनी वर जाऊन पाहिल असता संबंधित तरुणीने दरवाजाला आतून कडी लावून घेतली होती. बाहेरून अनेक जण ओरडू लागले पण आतून त्या तरुणीने प्रतिसाद दिला नाही. नंतर बऱ्याच वेळाने दरवाजाची कडी तोडून काही जणांनी दवाखान्याच्या रूममध्ये प्रवेश केला.
यावेळी संबंधित तरुणीने रूममध्ये असलेल्या पंख्याला गळफास लावून घेतल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. याची माहिती संबंधित डॉक्टरांनी विटा पोलिसांना फोन करून दिली. त्यावेळी विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला व साक्षीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. साक्षी दोनच महिन्यांपूर्वी संबंधित हॉस्पिटलमध्ये कामाला आली होती.
घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती त्यामुळे ती या ठिकाणी काम करत होती. परंतु साक्षीने दवाखान्यात का गळफास लावून घेतला हे मात्र समजू शकले नाही. साक्षीने आत्महत्या का केली या संदर्भात विटा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेने खानापूर तालुक्यात खळबळ माजली आहे.