महाराष्ट्रातील अनेक लोकांनी शेती हा व्यवसाय निवडला आहे. जास्तीस्त जास्त लोक हे शेती करून उदरनिर्वाह करतात. पण अनेक अडचणींचा सामना देखील शेतकरी वर्गाला करावा लागतो. तसेच अनेकवेळा नुकसानीलादेखील सामोरे जावे लागते. हातकणंगले तालुक्यातील माणगाव मध्ये देखील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळतो. माणगाव परिसरात ऊस उत्पादक शेतकरी वर्ग मोठा आहे. गेल्या दोन वर्षात कांही समाजकंटकांकडून ऊस पेटवून देण्याचा उद्योग सुरू आहे. यांमुळे आज अखेर हजारो एकर ऊस जळून खाक झाला आहे.
हातातोंडाला आलेल्या पीकाची राख पाहून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. माणगाव ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच राजू मगदूम यांनी आमदार अशोकराव माने तसेच हातकणंगलेचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या सोबत बैठक आयोजीत केली होती. माणगावांत ऊस जळाला अन् अपराधी पळाला अशी आख्यायिका होवून बसली आहे. तेंव्हा अशा समाजकंटकांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी बांधवांतून होत आहे.
गावातील कोणीतरी अज्ञात समाजकंठक ऊस पिक जाळत आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशा व्यक्तींचा शोध घेऊन ताबडतोब बंदोबस्त व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यामध्ये ऊस जाळणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घेऊन त्याला कडक शासन करण्याबरोबरच ज्या शेतकऱ्यांचे ऊस जळून नुकसान झाले आहे त्यांना पीकविमा सुविधा मिळणे बाबत चर्चा झाली.
पोलिस व ग्रा.पं.कडून अशा समाजकंटकांचा कायमचा बंदोबस्त करणेबाबत योग्य ती पावले उचलणार असल्याची माहिती सरपंच राजू मगदूम यांनी दिली आहे.