शिवनाकवाडीला लवकरच शुद्ध मुबलक पाणी उपलब्ध करून दिले जाणार; खा. धैर्यशील माने

सध्या शिवनाकवाडी आरोग्य केंद्रासह इतर रुग्णालयांमध्ये ६८ जणांचे वैद्यकीय पथक तैनात असून, तीन शिफ्टमध्ये २४ तास आरोग्य सेवा दिली जात आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविल्या जात असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, बुधवारी उपचार घेतलेल्या काही रुग्णांना पुन्हा त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी दिली.

संपूर्ण जिल्ह्यात या घटनेची दखल घेण्यात आली असून, प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिवनाकवाडी गावास भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली तसेच प्रशासनास आवश्यक त्या सूचना दिल्या.

शिवनाकवाडी येथे यात्रेदरम्यान अन्नातून विषबाधा झाल्याच्या घटनेची पाहणी खास धैर्यशिल माने यांनी केली. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, मदतकार्य वेगाने सुरू आहे. इचलकरंजी येथील आयजीएम व दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. आतापर्यंत एक हजारहून अधिक रुग्णांनी उपचार घेतले आहेत. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असून, दुसऱ्या दिवशी ४१६ जणांची पुनर्तपासणी करण्यात आली आहे.

इचलकरंजी येथील आयजीएम रूग्णालयात १५५  जणांवर उपचार सुरू असून ५ जण अतिदक्षता विभागात दाखल झाले आहेत. शिवनाकवाडीत झालेली विषबाधा कशामुळे झाली याचा अहवाल अन्न व प्रशासन विभागाकडून आल्यानंतरच स्पष्ट होईल. बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर होत असून, नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले.

 हर घर शुद्ध जल योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला आणि मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासन कटिबद्ध आहे. शिवनाकवाडी गावासाठी स्वतंत्र पाणी योजना अंतिम टप्प्यात असून, प्रशासन स्तरावर त्यावर लक्ष ठेवले जात आहे. यामुळे गावकऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. या कामात कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांनी संयम बाळगावा, लवकरच त्यांना शुद्ध मुबलक पाणी उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले.