विधानसभा निवडणुकीत सुहास जांभळे तुतारी वाजवणार!

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये जांभळे गटाने नेहमीच आपले वलय ठेवले आहे. एकाच कुटुंबातील एकाचवेळी तीन नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता असलेल्या जांभळे गटाकडे नगरपालिकेत आपले वर्चस्व कायम अबाधित राखले आहे. फक्त कुटुंबातीलच व्यक्तीला नव्हे तर त्या परिसरातील अनेकांना आपल्या सोबत निवडून आणून त्यांनी आपली ताकद सिद्ध करून कार्यकर्त्यांना ही बळ दिले आहे. शहापूर ग्रामपंचायत असताना सरपंच म्हणून काम केलेल्या अशोकराव जांभळे यांनी नंतरच्या काळात आमदार म्हणून ही आपली कारकीर्द यशस्वी केली.

त्याच्यानंतर पुत्र कै. नितीन जांभळे यांनीही इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये जांभळे गटाचे मोहोळ निर्माण केले आहे. विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी नितीन जांभळे इच्छुक होते. त्या दृष्टीने त्यांनी हालचाली ही सुरू केल्या होत्या. नितीनच्या अकाली निधनानंतर त्यांचे कनिष्ठ बंधू सुहास जांभळे यांनी राजकारणाची धुरा सांभाळली आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुहास जांभळे आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सोशल मीडियावर ही त्यांच्या नावाच्या पोस्ट झळकत आहेत. त्यामुळे याला दुजोरा मिळाला आहे.

शहरातील अशी परिस्थिती असताना शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत युवकांना संधी देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सुहासला ही संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जांभळे गटाने शरद पवार यांची वेळ मागितली असून येत्या काही दिवसात ते शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा शहराध्यक्ष सुहास अशोकराव जांभळे हे विधानसभा निवडणूकीत तुतारी वाजवण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने जांभळे गटाने हालचाली सुरू केल्या आहेत.