सध्या शासनातर्फे अनेक योजना राबविल्या जात आहेत. जेणेकरून जनतेला त्याचा पुरेपूर लाभ मिळेल. अनेक विकासकामांना वाव मिळेल. सध्या सौर ऊर्जा प्रकल्प योजना सर्वत्र गाजावाजा करीत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अभिनव योजनेअंतर्गत ४ मेगावॅट ४ हजार किलो वॅट विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी गरजेचे आहे. ०.५ मेगावॅट ते २५ मेगावॅट क्षमतेचा कृषी भार असलेल्या वितरण उपकेंद्रापासून ५-१० किमी परिघात विकेंद्रित सौर प्रकल्प स्थापित केले जातील त्या अनुषंगाने रेंदाळ येथील गायरान जमीन यळगूड स्टेशनला जवळ पडते याचा विचार करुन ग.नं. १२४८ मधील १० हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प सुरू केला आहे.
गाव सभेत सार्वजनिक शाळांना मोफत वीज, गावातील प्रमुख रस्ते, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, खेळाचे मैदान, रस्त्यांवरील पोलची उंची वाढवणे, सीएसआर फंड गावाच्या विकासासाठी खर्च करणे. यंत्रमाग धारकांना वीज स व ल त जमिनीच्या सपाटीकरणावेळी निघणाऱ्या मुरुमाचा ( गौण खनिज) पाणंद रस्त्यासाठी वापर, जागा मोजणी करताना संपूर्ण शासकीय भूखंडाची मोजणी करुन महाराष्ट्र करवसुली व फी नियम १९६० अन्वये ग्रामपंचायतीला कर आकारणी बाबत अधिकार अबाधित ठेवून कामकाज करणे यासारख्या मागण्यांची पूर्तता करण्याची लेखी मागणी केली होती.
मात्र गावकऱ्यांच्या हक्काची पायमल्ली करून या प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या हक्कांसाठी व योग्य मागण्यासाठी पाठपुरावा केल्याचे दिसून येत नाही शिवाय ग्रामपंचायत प्रशासनाने चुकीचे व बोगस ठराव प्रोसेडिंग सादर करून शासनाची व जनतेची दिशाभूल केली आहे. यामुळे गावकऱ्यांच्या विकासात्मक मागण्या पूर्ण झाल्याशिवाय सदर जागेवर कामकाजाला सुरुवात करु नये अशी मागणी निवेदनातून केली होती. मात्र कामकाज सुरू केल्याने २४ जानेवारी रोजी लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा डॉ. नेते यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांच्यासह संबंधित विभागाला दिले आहे.
रेंदाळ सौर ऊर्जा प्रकल्पाला मान्यता देताना गायरान मोजणी, शेती पंप, पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट, मोफत मिळायला पाहिजे अशी अट घातली आहे. स्वतंत्र सब स्टेशन करण्यासाठी होकार दिला होता. बहुतांश मागण्यांवर महावितरण सकारात्मक होते, मात्र मागण्यांबाबत यु टर्न घेऊन प्रकल्पाला सुरुवात केल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून आधी मागण्यांची पूर्तता मगच प्रकल्प सुरू करावा अशी मागणी करीत डॉ. सचिन नेते यांनी २४ जानेवारीला लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे.