सिग्नलमुळे वाहनचालक मेटाकुटीला…..

अलीकडे उन्हाची तीव्रता खूपच वाढत चाललेली आहे. अनेक ठिकाणी उष्माघाताने अनेक जण बळी पडलेले आहेत. उन्हाचा पारा वाढल्याने वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. त्यातच इचलकरंजी शहर वाहतूक शाखेने रखरखत्या उन्हात सिग्नल सुरू ठेवल्याने नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. गेल्या आठ दिवसांमध्ये उन्हाचा पारा ३८ अंशांच्या पुढे गेला आहे. नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. महत्त्वाच्या कामानिमित्त वाहनचालक घराबाहेर पडताना दिसत आहेत. सकाळी ९ वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.

अशातच शहरातील सिग्नलजवळ वाहनचालकांना सिग्नल लागल्याने थांबावे लागत आहे. प्रामुख्याने मलाबादे चौक, शिवतीर्थ, शाहू पुतळा आदी ठिकाणांतील सिग्नलजवळ थांबल्यावाचून गत्यंतरच नाही. उन्हाच्या झळा जास्त असल्याने वयोवृद्ध व लहान मुलांना त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. अशीच अवस्था पावसाळ्यातही असते. थांबले नाही, तर वाहतूक विभागाकडून सिग्नल मोडल्याची नोटीस येऊ शकते. अशा परिस्थितीत नागरिकांना किमान उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात तरी या सिग्नलसंदर्भात वाहतूक शाखेने निर्णय घेण्याची गरज आहे.