विटा आटपाडी घरफोडीतील तिघे संशयित जेरबंद; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

दिवसेंदिवस अनेक भागात चोरीच्या घटनांत भरमसाठ वाढ झालेली आहे. या चोरीचा उलगडा करणे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे. सांगलीच्या विटा आणि आटपाडीत घरफोडी आणि जबरी चोरी झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला होता. या दरम्यान घरफोडी करणाऱ्या तिघांना सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. तर त्यांच्याकडून चोरीच्या घटनेतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सांगलीच्या खानापूर विटा रस्त्यावरील महाविद्यालयानजीक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत आटपाडी येथील अक्षय महादेव माने, साहिल कुंडलिक चव्हाण आणि सचिन विठ्ठल माने या संशयिताना ताब्यात घेण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यातील विटा व आटपाडी येथे झालेल्या घरफोडीसंदर्भात चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी सांगली एलसीबीने एक पथक तैनात केले होते. सदर पथकातील पोलिसांना माहिती मिळाली.

चोरटे खानापूर विटा मार्गावरील महाविद्यालयासमोर दुचाकीवरून येणाऱ्या असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार परिसरात पोलिसांनी सापळा रचत तिघेजण दुचाकीवरून परिसरात येऊन थांबले. यानंतर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी संशयतांना ताब्यात घेतले. अक्षय माने यांच्या खिशात सोन्याचे दागिने मिळून आले. अधिक चौकशी केली असता अक्षय याने विटा पोलीस ठाणे हद्दीत तसेच आटपाडी पोलीस ठाण्यात हद्दीतील करगणीत चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तीन जणांना ताब्यात घेत असून त्यांच्याकडून चोरीतील सोने दागिन्यांसह दुचाकी असा मिळून दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याशिवाय या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.