प्रत्येक भागात पाण्याचा प्रश्न जाणवतोच. पण अलीकडे पाणी टंचाईवर सरकारतर्फे अनेक योजना राबविल्या जातात. ज्यामुळे नागरिकांच्या पाणी प्रश्नांवर दिलासा मिळत आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी सोडण्यासाठी खिरवडे व हत्तेगाव येथील पंप आज सुरू करण्यात आले. त्यामुळे लवकरच ऐतवडे बुद्रुक व परिसरात पाणी येणार असून ३० तारखेला करण्यात येणारे टाळे ठोक आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती राजारामबापू बँकेचे माजी संचालक शहाजी गायकवाड यांनी दिली.
ऐतवडे बुद्रुक, कार्वे, ढगेवाडी शिवपुरी, वाघवाडी, जकराईवाडी व परिसरातील तलाव आणि ओढ्यामध्ये वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी लवकरात लवकर सोडण्यात यावी. यासाठी शहाजी गायकवाड यांनी ३० तारखेला आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान, सांगली येथे पाटबंधारे खात्याचे वरिष्ठ अधिकारी व आमदार सत्यजित देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, भाजपचे नेते सम्राट महाडिक, संबंधित गावातील शेतकरी यांची बैठक होऊन तातडीने पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्याअनुषंगाने हत्तेगाव व खिरवडे येथील वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पंप सुरू करण्यात आले. त्यामुळे ऐतवडे बुद्रुक व परिसरात लवकरच पाणी येणार असल्यामुळे आंदोलन स्थगित केल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.
