खानापूर विधानसभा मतदारसंघात सुहास भैय्यांचाच बोलबाला……

सध्या आता लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेची धामधूम सुरू झालेली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघ खूपच चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी सर्वच पक्षात काम केले आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाला म्हणजेच सुहास भैया बाबर यांना विरोध नको असा सप्तसूर दोन्ही काँग्रेसमध्ये दबक्या आवाजात आहे. कधीकाळी बाबरांनी दोन्ही काँग्रेसमध्ये काम केले आहे आणि जरी शिंदे गटात राहिले तरी दोन्ही काँग्रेसची आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी सलोखा ठेवलेला होता.

सुहासभैया बाबर यांचा भाव वधारण्यामागे त्यांच्या वडिलांची पुण्याई हा एक भाग असल्याचे सध्या बोलले जात आहे. वडिलांच्या माघारी केवळ सहानुभूतीवर सगळ्या गोष्टी होणार नाहीत हे जाणून सुहासभैया बाबर देखील जी धडपड करत आहे ती देखील दखल घेण्यासारखी आहे.

खानापूर विधानसभा मतदारसंघातील विरोधक कोणत्या पक्षातून लढणार? महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा कोणाला जाणार? बंडखोरी होणार का? सर्वजण एकत्र येऊन एकच उमेदवार देणार का? अशा अनेक प्रश्नांच्या गोंधळात मात्र खानापुरातील बाबर विरोधक अडकले असताना महायुतीचे संभाव्य उमेदवार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास भैया बाबर हे खास खूपच ट्रेंडिंगमध्ये आलेले आहेत.

आता तर महायुतीच नाही तर महाविकास आघाडीचे नेतेही त्यांना जवळ करू पाहत आहेत. त्यामुळे सुहासभैया बाबर हे सध्या खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये ट्रेडिंग मध्ये असल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ पातळीवरून सुहासभैया बाबर यांना चांगली मदत होत असली तरी या मतदारसंघात निर्णायक ठरणारी आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील,माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख या युतीतीलच घटक पक्षातील नेत्यांचा सुहास भैया बाबरांना तसा विरोधच दिसतो. यापैकी अनेकांची भूमिका ही अजून गुलदस्त्यात आहे.

त्यामुळे आज तरी खानापूरच्या राजकीय शेअर बाजारामध्ये बाबर यांची तेजी दिसत आहे. त्यांचा आलेख चढता दिसत आहे. विरोधकांनी जर उद्या पत्ते उघडल्यावर त्यांची ही तेजी अशीच राहते की खाली येते हे पाहणे रंजक ठरणार आहे.