विटा येथील निवासी शाळेतील २९ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून सध्या ते विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. या शाळेत विषबाधेची घटना घडल्यानंतर जिल्ह्यातील अनेक अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय व निवासी शाळेस भेटी दिल्या. तेव्हा, शासन निवासी शाळेवर लाखो रुपयांचा खर्च करीत असल्यामुळे त्या जिल्ह्यातील, तालुक्यातील सरकारी अधिकाऱ्यांनी अचानक निवासी शाळेस भेटी देऊन कामकाज पाहावे, त्याप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य तो अहवाल देण्यात यावा.
सध्या मुख्याध्यापकांवर कोणतीही कारवाई न होता अद्याप ते कामावर आहेत.मुख्याध्यापक देवानंद धवसे यांची वर्तणुक शासकीय कर्मचाऱ्यास अशोभनीय आहे. तेव्हा, सखोल चौकशी करण्यासाठी त्यांचे निलंबन करावे अशी मागणी बहुजन अधिकारी- कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष एस. आर. भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या प्रकरणास मुख्याध्यापक देवानंद धवसे हे सर्वस्वी जबाबदार असल्याने त्यांचे निलंबन करावे, जेणेकरून राज्यामध्ये यापुढे कुठल्याही निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, या निवेदनाची एक प्रत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना पाठविल्याचे श्री. भोसले यांनी सांगितले.