येथील शाहूनगर परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ७० हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी जयवंत हणमंत बागडे (रा. विटा) यांनी शनिवारी रात्री उशिरा विटा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. विटा येथील जयवंत बागडे हे शाहूनगर उपनगरात नगरपरिषद शाळा नं. १३ जवळ वास्तव्यास आहेत. त्यांचा जोगता व्यवसाय असल्याने ते देवाच्या कार्यक्रमासाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते.
ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी चोरट्यांनी डब्यात ठेवलेली कर्णफुले, कानवेल, अंगठी असे सुमारे ७० हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. जयवंत बागडे हे शनिवारी दुपारी बाहेरगावाहून विट्यात घरी गेले असता त्यांना घराचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांना डब्यातील सोन्याचे दागिनेही चोरी झाल्याचे दिसून आले.