सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केलेली आहे. खानापूर आटपाडी मतदारसंघाचा एकूणच राजकीय इतिहास आणि रचना पाहिली तर राजकीय पक्षांपेक्षा स्थानिक नेत्यांमधील गट-तट प्रबळ आहेत, त्यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे. कुठलेही दोन किंवा अधिक गट एकत्र आल्यास यशाचे पारडे त्यांच्या बाजूने झुकू शकते. सद्यस्थितीमध्ये विटा शहरात वैभव पाटील यांना मानणारा गट आहे.
तर खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात बाबर यांना मानणारा वर्ग आहे. त्यामुळे बाबर आणि पाटील या दोन्ही गटांना आघाडी घ्यायची असल्यास आटपाडीचे सहकार्य आवश्यक ठरते. आटपाडी तालुक्यात माजी आमदार राजेंद्र देशमुख आणि तानाजी पाटील यांचा गट सक्रिय आहे. या दोन्ही गटांशी आघाडी साधण्याचा प्रयत्न बाबर आणि पाटील गटाकडून सुरु आहे. गतवेळी देशमुख यांनी आपले योगदान बाबर यांच्या पारड्यात टाकले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी माणगंगा साखर कारखाना निवडणूक आणि जिल्हा बँक निवडणूक यात बाबर गटाचे सहकार्य मिळाले नसल्याचा देशमुख गटाचा आक्षेप आहे.
त्यामुळे त्यांचे समर्थन बाबर यांना मिळणार का? देशमुख यांची नाराजी कशी दूर करणार हा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीत बाबर गटाने केलेल्या मदतीचा पैरा फेडण्यासाठी विशाल पाटील यांनी त्यांना समर्थन दिले आहे. जाहीर व्यासपीठावरच सुहास बाबर यांना पाठिंबा जाहीर केला. आता तानाजी पाटील हेही त्यांनाच समर्थन देणार का? वैभव पाटील काय करणार? चंद्रहार पाटील उमेदवारी मिळवणार का? शरद पवार यांच्या गटाने दावा सांगितल्यास ठाकरे काय करणार? अशा अनेक प्रश्नाची उत्तरे अद्यापही बाकी आहेत.