माळभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला; वाळवा सरपंच, उपसरपंच यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक

अलीकडच्या काळात अनेक भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. पाण्यासाठी नागरिकांची हेळसांड होते. अनेक भागात तर सतत होणाऱ्या गळतीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील उपस्थित होतो. वाळवा येथील माळभागातील पाण्याची मेन पाईपलाईन लिकेज झाल्याने येथील ग्रामस्थांना २१ व २२ जानेवारी रोजी पाण्यापासून वंचित रहावे लागले. याची दखल घेत सरपंच संदेश कांबळे व उपसरपंच चंद्रशेखर शेळके यांनी सलग १४ तास लिकेज काढण्याचे काम करून पाणीपुरवठा पूर्ववत केला. सरपंचांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत होते.

याबाबत माहिती अशी, मंगळवार- बुधवारी मेन पाईपलाईन फुटल्याने जवळपास ८ हजार लोकवस्ती असलेल्या माळभागावर गावकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. परिसरातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे धावा केला. वाळव्याचे लोकनियुक्त सरपंच संदेश कांबळे, उपसरपंच चंद्रशेखर शेळके यांनी गांभीर्याने दखल घेत युद्ध पातळीवर कार्यवाही करत पाईपलाईन दुरुस्त केली, अन माळभागावरील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाची छटा उमटली.

सरपंच आणि उपसरपंच यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वाळवा गावाला पाणीपुरवठा करणारी मेन पाईपलाईन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात मोठ्या प्रमाणावर लिकेज झाली होती. यावेळी सरपंच उपसरपंच यांची समय सूचकता, निर्णय क्षमता दाखवत काम केल्याने त्यांचे काम कौतुकास्पद ठरले. ग्रामस्थांनी कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच व उपसरपंच यांनी केले आहे.