सध्या खून, मारामारी, अपघात याबरोबर फसवणुकीच्या घटनांमध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या पंधराव्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीत दहा लाखांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी सोलर पॅनल बसविण्याच्या कामात हा अपहार झाला आहे. सहा लाख रुपये किमतीचे सोलर पॅनल तब्बल 16 लाखांना खरेदी केले आहे. याप्रकरणी जि. प. प्रशासनाने भादोले (ता. हातकणंगले) येथील महिला सरपंचासह ग्रामविकास अधिकार्यावर कारवाई केली आहे. भादोले येथील पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल कमी व्हावे, यासाठी सोलर पॅनल बसविण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी 15 व्या वित्त आयोगांतर्गत सोलर पॅनल बसविण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात आली.
मात्र, या कामात निविदा प्रक्रिया न राबविता थेट खरेदी केल्याचा प्रकार घडल्याची चर्चा सुरू झाली. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या सोलर पॅनलबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. पाणीपुरवठा योजनेस बसविण्यात येणार्या सोलर पॅनलची जिल्हा परिषदेने आदा केलेली रक्कम 15 लाख 80 हजार रुपये आहे, तर या पॅनलची बाजारातील किंमत 5 लाख 95 हजार 793 रुपये इतकी आहे. त्यामुळे आदा केलेली रक्कम आणि बाजारातील किंमत यामध्ये तब्बल 9 लाख 84 हजार 207 रुपये इतका फरक आहे. एवढ्या रकमेचा घोटाळा झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
याबाबत स्थानिकांनी केलेल्या तक्रारीवरून इतर तालुक्यातील विस्तार अधिकार्यांच्या नेतृत्वाखाली चौकशी करण्यात आली. तर, तांत्रिक मुद्द्यांबाबत कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यांच्या नेतृत्वाखाली चौकशी करण्यात आली. दोन्ही चौकशी अहवालांनुसार, या प्रकरणास जबाबदार सरपंच स्नेहा शिवाजीराव पाटील यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. संबंधित ग्रामविकास अधिकारी आर. एस. मगदूम यांच्यावर प्रशासकीय कारवाई सुरू आहे.