हुपरी येथून जवळच असणार्या पंचतारांकित औद्यागिक वसाहतीतील सिल्व्हर झोनमध्ये राहणार्या ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे (वय 29) या तरुण चांदी उद्योजकाचा खून करण्यात आला. हल्लेखोरांनी घराच्या कपाटातील पंचवीस किलो चांदी व दागिने लंपास केले असून ही खळबळजनक घटना रविवारी घडली.याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याचे समजते. याबाबतची माहिती अशी, सिल्व्हर झोनमध्ये हुपरी येथील नागरिक राहण्यासाठी आहेत. हा भाग गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. या ठिकाणी प्लॉट नंबर सी 13 मध्ये ब्रह्मनाथ हालुंडे हे आई-वडिलासह राहत होते. ब्रह्मनाथ व वडिलांचा चांदीचा व्यवसाय आहे.
शनिवारी 21 सप्टेंबर रोजी वडील व आई सुमन हे जैनवाडी येथील शेताकडे गेले होते, तर ब्रह्मनाथ हे घरी एकटेच होते. रविवारी सायंकाळी आईवडील घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडाच होता. आत प्रवेश करताच ब्रह्मनाथ रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी जोरात हंबरडा फोडण्यास सुरुवात केली त्यामुळे शेजारी जमा झाले. घरातील द़ृश्य पाहून सर्वांचाच थरकाप उडाला. तत्काळ हुपरी व गोकुळ शिरगांव पोलिसांना माहिती देण्यात आले.सशस्त्र हल्लेखोर जास्त असावेत. त्यांना ब्रह्मनाथ हे एकटेच घरी आहे याची माहिती असावी. त्यांनी त्यांच्या पोटात शस्त्राने वार केले होते. त्यांच्या बरगडित वार झाल्याने ते जाग्यावरच गतप्राण झाले.
कपाटातील 25 किलो चांदी व दागीनेही गायब असल्याने चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती असून नेमकी घटना कोणत्या कारणातून झाली याच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ब्रह्मनाथचेच कपाटातील चांदीचे दागिने व कची चांदी लंपास केल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. घरातील साहित्यही विस्कटलेले होते. त्याच्या वडिलांची चांदी मात्र जाग्यावरच आहे. घटनास्थळी पोलिसांना सोन्याची चेन आढळली.
चांदीची किंमत दहा लाखांपेक्षा जास्त आहे. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निरीक्षक एन आर चौखडे. निरीक्षक पंकज गिरी, सपोनि दिगंबर गायकवाड, प्रसाद कोलपे, नितेश कांबळे, दर्शन धुळे यांच्यासह पोलीस पथक, ठसे तज्ञ व श्वानपथकास पाचारण करण्यात आले. घटना दुपारनंतर घडल्याची शक्यता आहे.तुला सांगत होते त्याला एकट्याला सोडू नकोस, असा हंबरडा त्याच्या बहिणीने आईजवळ फोडल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे. त्यांच्या घराजवळ बांधकाम कामावर आठ ते कामगार काम करीत होते. आजूबाजूला लागून घरे असून मुख्य रस्त्यावरूनही घर स्पष्ट दिसते, असे असताना हल्लेखोरानी पाळत ठेऊन हा प्रकार केल्याचा कयास आहे.
घटनास्थळी आई वडील व बहिणीने प्रचंड आक्रोश केला. भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे या भागात भीतीचे वातावरण आहे. या भागात अशाप्रकारे चोरी करून खून केल्याची ही पहिलीच घटना आहे.या चोरी व खूनप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते. त्यानुसार जवळच्याच एका व्यक्तीवर संशयाची सुई असून चांदी चोरी, उघडलेले कपाट आणि काही परिस्थितीजन्य माहिती यामुळे पोलिस या घटनेची उकल लवकरच करतील, असे बोलले जात आहे.