अनेक भागात सध्या यात्रा सुरु आहेत. या यात्रामध्ये अनेक कार्यक्रम घेतले जातात. अनेक भागात बैलगाडी शर्यती देखील घेतल्या जातात. सांगोला येथील अंबिकादेवी यात्रेस उद्या गुरुवार, ३० जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. आज बुधवार, २९ जानेवारी रोजी जागा वाटप करण्यात येणार आहे. शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी आकर्षक दारुकामाने सांगोला यात्रेची सांगता करण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत शेती विषयक प्रदर्शन, विद्यार्थ्यांच्या व महिलांच्या विविध स्पर्धा, जंगी कुस्त्या, शोभेचे दारूकाम कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
यंदा यात्रेत दुकानदार, व्यावसायिकांची रेलचेल असणार आहे. त्याचप्रमाणे पाळणे, खेळण्याची दुकाने, मिठाई, जिलेबी दुकाने, गृहउपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने, मनोरंजनाची साधने, शेतीची अवजारे आदी विक्री करणारे लहान-मोठे व्यावसायिक येणार आहे. जिल्हा न्यायाधीश सो, पंढरपूर यांनी २४ जानेवारी रोजी अंबिकादेवी यात्रेचे कामकाज पाहण्यासाठी कोर्ट रिसिव्हर म्हणून सहाय्यक सरकारी वकील अॅड. सारंग वांगीकर, अॅड. विक्रांत बनकर, ॲड. विशालदीप बाबर, अॅड. नितीन बाबर, अॅड. शशिकला खाडे, अॅड. महेंद्र पत्की यांची नेमणूक केली आहे. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात यात्रा भरणार असून रस्त्याच्या व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कोर्ट रिसिव्हर यांनी सांगितले आहे.