Police Bharti 2025 : तयारीला लागा! राज्यात लवकरच १० हजार जागांसाठी मेगा पोलीस भरती! ‘या’ महिन्यात सुरु होणार प्रक्रिया

पोलीस विभागात नोकरी मिळवण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण राज्यात लवकरच पोलीस भरती होणार आहे. या पोलीस भरती अंतर्गत १० हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.तसेच डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणारी पदेदेखील भरली जाणार असल्याची माहिती आहे.

साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, फेब्रुवारी महिन्यात या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. १० हजार जागांसाठी ही भरती होणार असून या भरतीचा मैदानी टप्पा पावसाळ्याआधी पूर्ण केला जाणार आहे. वाढती लोकसंख्या आणि राज्यातील गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ही भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या भरती प्रकियेमुळे ज्या तरुणांचं पोलीस विभागात काम करण्याचं स्वप्न आहे, त्यांचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. लवकरच या पोलीस भरतीची जाहिरातही निघणार आहे. त्यामुळे तरुणांनी भरती प्रक्रियेच्या तयारीला लागण्याची आवश्यकता आहे.

कशी होणार पोलीस भरती?

पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी काही पात्रता आणि निकषांची पूर्ति करावी लागते. यानंतर पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा, शारीरिक तपासणी आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात. सर्वप्रथम उमेदवारांना ग्राउंड परीक्षेसाठी बोलावले जाते. त्यात उत्तीर्ण झाल्यावरच लेखी परीक्षा घेतली जाते.

पोलीस भरतीसाठी तयारी करताना तरुणांना शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ठरलेली असते. पुरुष उमेदवाराची उंची १६५ सेंटीमीटर असावी, तर महिला उमेदवाराची उंची १५५ सेंटीमीटर असावी, तर छाती ७९ सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी, असे निकष घालून देण्यात आले आहेत.