सध्या अनेक भागात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन अपघातांच्या प्रमाणात वाढ होत चाललेली आहे. आटपाडी शहरात सध्या अतिक्रमण खूपच वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून आटपाडी शहरामध्ये सुरू असलेल्या साई मंदिर ते साठेचौक रस्त्याच्या कामावरून वादंग सुरू आहे. एकीकडे रस्ता व बांधकाम हा प्रश्न असतानाच खासगी जागेतले अतिक्रमण चर्चेत आले. बिगरशेती प्लॉटच्या रस्त्यामध्ये झालेले अतिक्रमण कोणी काढायचे? हा मुद्दा ऐरणीवर आला. साई मंदिर ते साठे चौक या रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले असून हे अतिक्रमण कोण काढणार? काही दिवसांपूर्वी मुख्याधिकारी यांनी
काढलेल्या नोटिशीचे काय झाले? असा सवाल जनता करत आहे. बसस्थानक परिसरात तर चक्क ड्रेनेजवर इमारत उभी केली आहे. चौंडेश्वरी कॉलनी येथे तर ओढापात्रात पक्की घरे बांधली आहेत. ओढा पात्र बुजवून अतिक्रमण करण्यात आलेले आहे.