सध्या गुन्हेगारी क्षेत्रात भरमसाठ वाढ झालेली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण आहेच त्याचप्रमाणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान देखील उभे राहिलेले आहे. पण इचलकरंजीत चक्क वरिष्ठ अधिकाऱ्यानेच बचत गटातील महिलांच्या कानाखाली लगावली असल्याचा प्रकार घडला आहे. इचलकरंजी येथील उपनगरातील महिला बचत गटात किरकोळ वादावादी झाली होती. हे प्रकरण त्या एका औद्योगिक वसाहतीत असलेल्या पोलीस ठाण्यात पोहचले. येथेही किरकोळ वाद झाला. या वादाने त्या वरिष्ठ अधिकाऱ्याची चांगलीच सटकली आणि त्याने चक्क बचत गटातील महिलांच्या कानाखाली लगावली. अचानक घडलेल्या या प्रकाराने महिलांची एकच तारांबळ उडाली.
चुक लक्षात आल्यानंतर त्या अधिकाऱ्याने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. काही माजी लोकप्रतिनिधींनी महिलांची समजूत काढून विषयावर पडदा टाकला. सध्या या प्रकरणावर पडदा पडला असला तरी चक्क महिलांवर हात उचलण्याचं धाडस ‘त्या’ अधिकाऱ्याकडे आलेच कुठून, असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. प्रजासत्ताक दिनी हा प्रकार घडला असून वरिष्ठ पोलीस अधिकारीही याबाबत अनभिज्ञ आहेत की जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात, असेही लोक बोलत आहेत.पोलीस अधिकाऱ्यांकडून महिलांचा अनादर होत असून मंगळसुत्र विकायला लावण्यासह कानाखाली मारण्यापर्यंत मजल गेलेल्या अधिकाऱ्यांवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिला वर्गातून पुढे येऊ लागली आहे.