इचलकरंजी महानगरपालिकेतील कर्मचान्यांशी ‘रेट कार्ड’ संदर्भात आयुक्तांनी साधला संवाद

इचलकरंजी महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील अधिकारी व काही कर्मचाऱ्यांकडून रजा मंजूरीसाठी रेट कार्ड निश्चित करुन मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक पिळवणूक सुरु असल्याबद्दलचा तक्रार अर्ज आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे देण्यात आला होता. त्यावरुन महानगरपालिकेत मोठी खळबळ माजली होती. या संदर्भातील शहानिशा करण्यासाठी आयुक्त पाटील यांनी शनिवारी श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात सफाई कर्मचाऱ्यांसह आरोग्य अधिकारी व स्वच्छता निरिक्षक यांच्याशी संवाद साधला. 

प्रथमतः आयुक्तांनी उपस्थित आरोग्य अधिकारी, मुख्य स्वच्छता निरिक्षक, स्वच्छता निरिक्षकांना थोडा वेळ बाहेर थांबण्यास सांगत कर्मचाऱ्यांशी बातचित केली. सुमारे तास-दोन तास बैठक सुरू केली. सुमारे तास-दोन तास बैठक सुरू होती. यावेळी आयुक्त पाटील यांनी काही कर्मचाऱ्यांना समोर प्रत्यक्ष सह्या करण्यास सांगून ती सही व तक्रार अर्जावरील सही याची पडताळणी केली. त्यावेळी तक्रार अर्जावरील सद्या बोगस असल्याचे उघड झाले. तर कर्मचाऱ्यांनीही अर्जावर आपल्या सह्या नसून कोणीही आपल्याकडे पैसे मागत नसल्याचे सांगितले.

यावर आयुक्तांनी असे प्रकार घडत असतील तर आपण केव्हाही मला फोनद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून माझ्याकडे तक्रार करु शकता, असे सांगितले. यावेळी कर्मचाऱ्यांनीही काही अडचणी व मागण्या ही आयुक्तांना सांगितल्या.