वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी खमक्या अधिकाऱ्याची गरज

इचलकरंजी शहरातील लोकसंख्येबरोबर वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे परतुं शहरात नवीन अधिकारी आले. मात्र, शहरातील वाहतुकीच्या समस्या काही सुटल्या नाहीत. वाहतूक व्यवस्था (Traffic System) सुरळीत करण्यासाठी खमक्या अधिकाऱ्याची आता शहराला गरज आहे. तरच वर्षानुवर्ष भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या प्रश्नापासून शहर वासियांची सुटका होऊन अपघाताचे प्रमाण कमी होईल. त्यासाठी इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखा, महानगरपालिका प्रशासन व प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) या विभागाने एकत्र येवून ठोस कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

शहराची लोकसंख्या वाढली तसेच दळणवळणाचे महत्त्वाचे साधन असणारे मोटरसायकल तसेच चारचाकी वाहनात वाढ झाली. वाहनांची संख्या जसजशी वाढत गेली तसे शहरातील रस्ते मोठे करणे गरजेचे होते. मात्र, तसे महापालिकेकडून झाले नाही. वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी ज्या शहर वाहतूक शाखेकडे होती. त्यांच्याकडून ही ठोस पावली उचलली गेली नाहीत. त्यामुळे शहरातील वाहतुकीचे समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे.वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी प्रामुख्याने शहर वाहतूक शाखेची आहे. मात्र, या शाखेने त्याकडे  सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. शहरांमध्ये सिग्नल बसले परंतु काही कालावधीनंतर तेही बंद पडले. तसेच चौकाचौकामध्ये वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस कर्मचारी उभे करणे आवश्यक असताना सर्व कर्मचारी शहर वाहतूक कार्यालयासमोर रेंगाळताना दिसतात. याकडे  शहर वाहुतक शाखेचे वरिष्ठ अधिकारी कानाडोळा करताना दिसतात. याच्या मागील गोडबंगाल काय ? तसेच काही कर्मचारी नाक्यावर आणि मोक्याच्या ठिकाणी थांबून शिस्तीच्या नावाखाली अर्थकारण करताना दिसतात. शहरातील वाहतूक आणि त्या वाहतुकीपासून उद्भवणाऱ्या समस्या पासून काय मार्ग काढता येईल या दृष्टीने प्रयत्न करणे त्या अधिकाऱ्यांचे आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे काम आहे परंतु तसे होताना दिसत नाही.