कार्वेत अवघ्या दोन महिन्यात एमडी ड्रग्जचा बिनबोभाटपणे कारखाना; आणखी नेटवर्कचा तपास सुरु

विटा शहरापासून दूर कार्वेतील औद्योगिक वसाहतीमध्ये बंद शेडमध्ये परफ्यूमच्या नावाखाली अवघ्या दोन महिन्यात एमडी ड्रग्जचा कारखाना उभारला गेला. उत्पादनही सुरू झाले. शेजारी कोणताच कारखाना नाही. काही अंतरावरील कारखान्यातील कोणालाच माहिती पडली नाही. समोर महावितरणच्या उपकेंद्रातून वीज जोडली गेली. परप्रांतीय येऊन एमडी बनवू लागले. औद्योगिक वसाहतीच्या अधिकाऱ्यांनाही याची माहिती पडली नाही. उत्पादन सुरू होऊन माल तयार होऊन बाहेरही पाठवला गेला. त्यानंतर छापा पडला. कार्वेतील कारखान्यात एमडी जप्त केल्यानंतर आजूबाजूला मास्क पडल्याचे दिसून आले. उत्पादन करताना ग्लोव्हजचा वापर केला जात होता.

केवळ वासानेच डोके गरगरणे तसेच डोळे चुरचुरत असल्याचे बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी सांगितले. त्यावरून परप्रांतीय कामगार धोकादायकपणे उत्पादन करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बलगवडेचा प्रवीण शिंदे, त्याचे साथीदार वासुदेव जाधव, प्रकाश मोहिते, विकास मलमे, अविनाश माळी, मांजर्डेचा प्रसाद मोहिते, कुपवाडचा आयुब मकानदार, साथीदार अक्षय तावडे, रमजान मुजावर, सांगलीतील अथर्व सरवदे, संतोष पुकळे त्यानंतर विट्याजवळील बलराज कातारी अशी एमडी ड्रग्जच्या उत्पादन आणि तस्करीतील संशयित आतापर्यंत पकडले गेले आहेत.

जिल्ह्यात आणखी कोठे नेटवर्क पसरले आहे, याचा पोलिस शोध घेत आहेत.एमडी ड्रग्जच्या एका ग्रॅमची किंमत ३ ते ४ हजार रुपये आहे. बॉलिवूड पार्ट्यांसह मुंबई, पुण्यात याची तस्करी होते. ‘म्याव – म्याव’, कॅट, चॉकलेट, चावल, कॉटर आदी वेगवेगळ्या नावाने याची विक्री होते. चरस, गांजा, कोकेन, केटामाइनची जागा आता एमडीने घेतली आहे. पावडर किंवा गोळ्याच्या स्वरुपात ते बनवले जाते. काहीजण गुटख्यातून तसेच पाण्यातून तोंडावाटे या ड्रग्जची नशा करतात.