मनिषकुमार धूत यांचा सूत व कापड खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची क्रिशव फॅबटॅक्स या नावाची फर्म आहे. हुलगेश्वरी रोडवर असलेल्या या फर्मच्या माध्यमातून ते सूत मालाच्या आवश्यकतेनुसार विविध इंडस्ट्रीजकडून ते सूत खरेदी-विक्री करतात. त्यातूनच त्यांची अग्रवाल कुटुंबियांशी ओळख झाली. धूत यांना आवश्यक सूताचा पुरवठा करुन व्यवहाराच्या माध्यमातून त्यांनी धूत यांचा विश्वास संपादन केला. विश्वास संपादन करुन मागणीनुसार सूत पुरविण्याचे सांगत व्यापाऱ्याची १ कोटी २१ लाख ४४ हजार ३७० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील ७ सूत व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयुर पंकज अग्रवाल, वर्षा विशाल अग्रवाल, पंकज पुष्पक अग्रवाल, पियुष पंकज अग्रवाल, प्रविण पुष्पक अग्रवाल, दिशा प्रविण अग्रवाल व विशाल उर्फ पप्पी अग्रवाल अशी त्यांची नांवे आहेत. या प्रकरणी मनिषकुमार कैलाशचंद्र धूत यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी पंकज अग्रवाल याला अटक केली असून न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.