मागण्या पूर्ण होईपर्यंत लोणारी समाजाच्या पाठीशी राहणार ठाम ; मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

सांगोला तालुक्यातील प्रमुख समाज असलेल्या लोणारी समाजाचे समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचे स्मारक आणि लोणारी समाजातील समाज बांधवांसाठी सांगोला शहरात भव्य असे लोणारी भवन उभारण्यासाठी राज्य सरकारने ५ कोटी रुपयांची तरतूद करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

सांगोला तालुक्यातील अत्यंत प्रामाणिक आणि कष्टकरी समाज म्हणून लोणारी समाज अनेक वर्ष समाज व्यवस्थेत गुण्यागोविंदाने नांदत आहे. या समाजातील समाज बांधवांनी नेहमीच आज पर्यंत इतरांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे.

या समाजाने आजवर कधीच स्वतःसाठी काही मागितले नाही प्रथमच या समाजाने सांगोला शहरात समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचे स्मारक आणि लोणारी समाजातील घटकांसाठी लोणारी भवन उभा करावे तसेच समाजातील विद्याथ्यांसाठी सुसज अभ्यासिका असावी अशी मागणी केली आहे.

आपल्या मागण्यांसाठी लोणारी समाजातील काही तरुण नुकतेच सांगोला शहरात आमरण उपोषणास बसले होते. लोणारी समाजाच्या मागणीची तीव्रता लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी लोणार समाजाला न्याय मिळावा म्हणून पुढाकार घेतला आहे.

ज्या समाजाने आजपर्यंत इतरांना देण्याची भूमिका घेतली त्या समाजाला त्यांचा न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी समाज बांधवांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी लोणारी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असे वक्तव्य मा. आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी केलेले आहे.