लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलेली सर्वानीच पहिली. अनेक पक्षप्रवेश देखील झाले. विधानसभा निवडणुकीत बऱ्याचजणांना विधानपरिषदवर नेत्यांकडून शब्द मिळाल्याने आता आपणाला संधी मिळणार असे मनोमन विश्वास देखील निर्माण झालेला आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अर्धा डझन नेते इच्छुक आहेत. यापूर्वी बारा पैकी सात जागा भरल्या असून, पाच जागा रिक्त आहेत. यासाठी भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार संजय मंडलिक, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यासह भाजपचे महेश जाधव, शिंदेसेनेचे सत्यजीत कदम आदींची नावे चर्चेत आहेत. पण, एकट्या कोल्हापूरला किती जागा देणार? हेही महत्त्वाचे आहे.
यापूर्वी काँग्रेस आघाडीचे सरकार असताना ए. वाय. पाटील यांचेही नाव प्रत्येकवेळी चर्चेत यायचे, परंतु त्यांना काय संधी मिळालीच नाही. विधानसभेच्या इच्छुकांना गाजर दाखवण्यासाठी या पाच जागा रिक्त ठेवल्या होत्या. शिवाय विधान परिषदेचे पाच आमदार विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्या जागाही रिक्त होत आहेत. त्यामुळे अनेकांना आपल्याला संधी मिळेल असे वाटते. आता, विधानसभेला शब्द दिलेल्यांनी आपआपल्या नेत्यांकडे प्रयत्न सुरू केले आहेत. एकाच जिल्ह्यात किती जणांना संधी देणार हे खरे असले तरी हाळवणकर, मंडलिक व डोंगळे यांनी नेत्यांकडे निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत.
शिवसेनेच्या फुटीनंतर ज्यांनी आपल्याला साथ दिली त्यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे लोकसभेला पराभव झाल्यावर जसे भावना गवळी यांचे पुनर्वसन झाले तसेच पुनर्वसन मंडलिक यांचेही केले जाईल, अशा घडामोडी आहेत. आमदार होऊन कामे करायची आणि ताकदीने लोकसभेला सामोरे जायचे यासाठी त्यांना बळ दिले जाणार असल्याचे सांगण्यात येते.