सध्या अनेक भागात पिसाळलेल्या कुत्र्यांचा वावर वाढलेला आहे. त्यामुळे वाहतुकीस तर अडथळा निर्माण होतो त्याचप्रमाणे अनेकांना या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या घटना देखील घडत आहेत. विटा येथील विटा – कऱ्हाड रस्त्यावरील विटा हायस्कूल, विवेकानंदनगर, शाहूनगर परिसरात शनिवारी सायंकाळी अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत एकाचवेळी तब्बल ४० हून अधिक नागरिकांचा चावा घेतला.पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांबरोबर रस्त्यावरील व पाळीव कुत्र्यांसह दारात बांधलेल्या जनावरांचाही चावा घेतला.
२६ जणांनी विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले. यातील गंभीर जखमा झालेल्या १३ जणांना पुढील उपचारांसाठी सांगलीकडे पाठवण्यात आले. दरम्यान, आज माजी उपनगराध्यक्ष दहावीर शितोळे, अविनाश चोथे, विकास जाधव, माधव रोकडे, गजानन निकम, कुलदीप पवार, डॉ. दिलीप पवार, प्रकाश गायकवाड, भगवान पाटील, बाळासाहेब मुळीक, शंकर शिंदे, सदाशिव मांगले यांच्या टीमने विवेकानंदनगर परिसरातील जखमी नागरिकांची भेट घेऊन विचारपूस केली. नगरपालिका प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. काही नगरसेवकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.