हातकणंगले, शिरोळात दोनशेपेक्षा अधिक मते, आव्हान उभे करण्याची रणनीती

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अनेक पक्षप्रवेश तसेच राजकीय समीकरणे बदलली. आता महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकाकडे प्रत्येकाची नजर लागलेली आहे. जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक यांचे नाव महायुतीकडून ‘कोल्हापूर स्थानिक स्वराज्य’ संस्था गटातून पुढे करण्याची शक्यता आहे. या निवडणुकीला अजून दोन वर्षाचा कालावधी आहे, तत्पूर्वी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. आमदार सतेज पाटील हे महाविकास आघाडीकडून पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात कागदावर महायुती सध्या तरी भक्कम दिसते, सगळे एकसंध राहिले तरच मादनाईक सतेज पाटील यांच्यासमोर आव्हान उभे करू शकतात. इचलकरंजी महापालिकेसह पेठवडगाव, जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ नगरपालिका व हातकणंगले, हुपरी नगरपंचायती त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे १६ व हातकणंगले, शिरोळचे दोन सभापती असे दोनशेपेक्षा अधिक मते हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील आहेत. या संस्थांवर माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांचे प्राबल्य राहिले आहे. हेच गणित पाहून मादनाईक यांना पुढे करून सतेज पाटील यांच्यासमोर आव्हान उभे करण्याची रणनीती आहे.