नद्या, पाणी, निसर्ग यामध्ये देशभर काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांच्या कामाला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने गेल्या चार वर्षापासून देशभरात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा दिल्ली येथे सन्मान केला जातो.
सांगोला – भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने तसेच राष्ट्रीय जलजीवन मिशन, राष्ट्रीय जलमिशन व एन. आय यु ए यांच्या सहयोगातून नद्या, पाणी, निसर्ग यामध्ये देशभर काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांच्या कामाला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने गेल्या चार वर्षापासून देशभरात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा दिल्ली येथे सन्मान केला जातो. देशभरातील पाण्याची अवस्था बिकट होत चालली आहे.
या परिस्थितीत बदल घडवायचे असतील तर नद्या निसर्गाचे संगोपन झाले पाहिजे, म्हणून या क्षेत्रात स्वयंस्फुर्तीने काम करणाऱ्या संस्थाचा सन्मान भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने करण्यात येतो. त्या अनुषंगाने काम करणाऱ्या व प्रयत्नशील असणाऱ्या देशभरातील ३२ व्यक्तींच्या सन्मानाचे आयोजन दिल्ली येथील महाराष्ट्र सदन मध्ये दिनांक १३ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे संयोजक अनिल सिंह सागर व मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय साठे यांनी कार्यक्रमाची उत्कृष्ट पद्धतीने तयारी करून देशभरातील ३२ नदी प्रहरींचा शाही सन्मान केला. या सन्मान सोहळ्यासाठी माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे यांची निवड झाली होती.
या संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे व सचिव डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी यांचा या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन या संस्थेच्या प्रतिनिधींचा यथोचित सन्मान करण्यात आला.
हा सन्मान वित्त मंत्री भागवतजी कराड, खासदार पर्भतभाई पटेल, मा. गोपीजी शेट्टी, मा. उन्मेश पाटील, मा. रमेश वर्मा, मा. रमेश बिदोरी, मा. बलवीर सिंह, जलपुरुष राजेंद्र सिंह राणा, कलाक्षेत्रातील थोर व्यक्तिमत्व श्रीमती रमा पांडे इत्यादींच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर डॉ. नितीन वाघमोडे-आयकर आयुक्त पुणे, डॉ. प्रशांत गाडेकर-आयकर आयुक्त कोल्हापूर, डॉ. उज्वल चव्हाण-अतिरिक्त आयकर आयुक्त जळगाव, विष्णू पाटील उद्योजक दिल्ली इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने सन २०२३ च्या जलपरी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सदर पुस्तकात वैजिनाथ घोंगडे यांनी लिहिलेल्या माणगंगा नदी विषयाच्या माहितीचा सविस्तर लेख प्रकाशित करण्यात आला. त्याची पाहुण्यांच्यावतीने प्रशंसा करण्यात आली. शेवटी समन्वयक अमेय साठे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.