विटा तहसील कार्यालयामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा वेळेत मिळाव्यात, नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विटा तहसील कार्यालयात भेट दिली. यावेळी विविध दुर्लक्षित समाज घटकांच्या जातीचे दाखले देण्याच्या उपक्रमाची जिल्हाधिकारी काकडे यांनी माहिती घेतली. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल, तहसीलदार योगेश्वर टोपे, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे उपस्थित होते.
खानापूर तालुक्यात उत्सव आणि यात्रांमध्ये शांततामय वातावरण राखण्यासाठी पूर्व नियोजन करावे. आंतरविभागीय समन्वय ठेवावा. नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा वेळेत मिळाव्यात या सूचना दिल्या. वडार, नंदीवाले, गारुडी, गोसावी, कुणबी इत्यादी समाजघटकांना विशेष मोहीम राबवून दाखले देण्याचे काम सुरू आहे. समाजघटकांच्या दारी महसूल विभागाचे कर्मचारी जाऊन फॉर्म भरून घेण्याचे काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून खानापूर तालुक्यात ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या. मात्र वंशावळ जुळत नसल्याने दाखले काढता येत नव्हते, अशांसाठी खानापूर महसूल विभागाकडून मोहीम राबविण्यात आली आहे.