शौचालये पाडल्याने नागरिकांची गैरसोय; शौचालय अनुदान उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन

प्रत्येक भागात सेवासुविधा मिळाव्यात यासाठी कायम सरकारतर्फे प्रयत्न होत राहतात. पण अनेक भागात आजही अनेक सुविधांचा आभा असलेले पहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांकडून नाराजीचा सूर सतत उमटत असतो. पेठवडगाव नगरपालिका प्रशासनाने १५ दिवसांपूर्वी सुतार गल्लीतील  सार्वजनिक शौचालय पाडले आहे. यामुळे सुतार गल्ली परिसरातील बहुसंख्य नागरीकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. आज अखेरही या परिसरात अथवा शहरातील सर्व घरांमध्ये शौचालय बांधकाम पूर्ण नाहीत. यामुळे सार्वजनिक शौचालयाची शहरात गरज आहे.

सार्वजनिक शौचालये पाडल्याने नागरिकांची होत असलेली गैरसोय ही अडचणीची आहे. पालिका प्रशासनाने सुतार गल्लीतील पाडलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था तातडीने करावी. तसेच परिसरातील नागरीकांना शौचालय अनुदान द्यावे या मागणीचे निवेदन येथील युवक क्रांती आघाडीच्या नेत्या प्रविता सालपे यांच्या नेतृत्वाखाली वडगाव नगरपालिका प्रशासनास देण्यात आले. यामुळे या ठिकाणी पालिकेने तात्काळ पर्यायी व्यवस्था करावी व या भागातील नागरिकांना शौचालय अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. 

निवेदनावर माजी उपनगराध्यक्ष रंगराव पाटील बावडेकर, सुकुमार भिमराव पाटील, अजय थोरात, शरद पाटील, संतोष चव्हाण, अशोक झगडे, रमेश बेलेकर, प्रकाश बुचडे, संतोष गाताडे, दिपक खरोशे, सुधीर पोळ, रमेश शिंपणेकर, संतोष ताईंगडे, अविनाश तेली यांच्या सह्या आहेत.