घरनिकी येथे पाणी योजनेच्या चौकशीची मागणी

आटपाडी घरनिकी (ता. आटपाडी) येथे जलजीवन योजना पूर्ण करूनही या योजनेतून पाणी मिळत नसल्याने संबंधित ठेकेदार व अधिकारी यांची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अन्यथा उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे पत्र ग्रामसेवक व गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर यांना देण्यात आले.


यावेळी महिपतराव पवार, अक्षय माने, महेश पोतदार, अमोल मिटकरी, विकी बेरगळ उपस्थित होते. दोन वर्षांपासून योजनेचे काम अद्याप सुरूच आहे. सव्वाकोटी खर्च करूनही पाणी मिळेना त्यामुळे ‘जलजीवन’च्या झालेल्या कामाची चौकशी करून कारवाई न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दहा दिवसांत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी यासाठी २७ रोजी घरनिकी ग्रामपंचायतसमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा महिपतराव पवार, अक्षय माने, महेश पोतदार यांनी दिला आहे.