सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात बहुचर्चित ठरलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या तिरंगी लढतीत अखेर शेकापच्या डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगोल्यावर पुन्हा लाल बावटा फडकावला. सांगोल्यात पूर्वीपासूनच शेकापचे स्व. गणपतराव देशमुख आणि पूर्वाश्रमीच्या काँग्रेसचे व आताच्या शिंदेसेनेचे शहाजीबापू पाटील यांच्यातच दुरंगी लढत होत होती. या दुरंगी लढतीत तालुक्यात प्राबल्य असलेल्या धनगर व मराठा समाजातील मतदारांचा आपापल्या समाजाच्या उमेदवाराला पाठींबा असायचा आणि विजयासाठी लागणारी मते ही मुस्लीम, दलित व ओबीसी समाजातील मतदारांमधून मिळवली जायची.यावेळी झालेल्या तिरंगी लढतीत धनगर समाजाची एकगठ्ठा मते ही शेकापचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना मिळाली. परंतु दुसरीकडे, शिंदेसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील व उध्दवसेनेचे उमेदवार दीपकआबा साळुंखे-पाटील हे दोघेही मैदानात उतरल्याने मराठा समाजातील मतदारांमध्ये मात्र, विभागणी झाल्यामुळे या मतविभागणीचा लाभ शेकापचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे चांगलाच पथ्यावर पडला आणि दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ या उक्तीप्रमाणे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या गळ्यात विजयाची माळ पडल्याचे बोलले जात आहे.
सांगोला विधानसभा मतदार संघातील प्रमुख तीन उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :
* बाबासाहेब देशमुख – १,१६,२८०
* शहाजीबापू पाटील ०,९०,८९६
* दीपकआबा साळुंखे-पाटील – ०,५१,०००
* शेकापचे डॉ.बाबासाहेब देशमुख २५ हजार ३८४ मतांनी विजयी.