नागाव व टोपला जोडणाऱ्या ठिकाणी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग करण्याची मागणी…..

प्रत्येक भागात काही ना काही सुविधांचा अभाव हा असतोच. त्यामुळे नागरिकांची नाराजी असतेच. या सुविधा पूर्ण करण्यासाठी अनेकवेळा मागणीचे निवेदन देखील दिले जाते.सध्या रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या महामार्गामध्ये नागाव व टोपमधील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. हा महामार्ग नागाव मधील शेतकऱ्यांना शेताच्या बरोबर मधून गेल्यामुळे शेतीचे दोन भाग झाले आहेत. तसेच टोपकडे जाण्यासाठी हा महामार्ग ओलांडून जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी शिये फाटा किंवा मौजे वडगावकडे तीन ते चार किमी फिरून यावे लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे.

त्यामुळे नागाव व टोपला जोडणाऱ्या सदर ठिकाणी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग करावा अशा आशयाचे निवेदन परिसरातील शेतकऱ्यांनी खा.धनंजय महाडिक, खा.धैर्यशील माने, आ. अशोकराव माने, आ.अमल महाडिक यांना देण्यात आले. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग ऑफिस उजळाईवाडी यांना देण्यात आले आहे.

दरम्यान, मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विकास आघाडीचे नेते विजय पाटील यांनी यावेळी दिला आहे. यावेळी विलास ऐतवडे ग्रामपंचायत सदस्य सागर गुडाळे, कुमार राठोड, राहुल पाटील, विवेक नागावकर, रंगराव गुडाळे, दादोबा गुडाळे, संभाजी रेवले, शिरीष शिराळे, विलास सावंत, निवास चौगुले, नितीन चौगुले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.