भुईटे वस्ती जळीतग्रस्त शेख कुटुंबीयांना मदत करत आपुलकी प्रतिष्ठानने जपली आपुलकी! 

सांगोला कडलास रोड नजिक असलेल्या बापूजीनगर, डांगे वस्ती येथील जस्मिन जैरुद्दीन शेख यांच्या राहत्या पत्रा शेडला आग लागून शुक्रवारी मोठे नुकसान झाले. जळीतग्रस्त शेख कुटुंबीयांना आपुलकी प्रतिष्ठानने किराणा साहित्य, अंथरूण -पांघरून व संसारोपयोगी भांडी देऊन आधार देत आपुलकी जोपासली. जस्मिन शेख या आपल्या परिवारासह माळेगाव, बारामती येथे वास्तव्यास होत्या. पतीचे निधन झाल्यानंतर सांगोला येथे आई-वडिलांकडे राहायला आल्या आहेत. त्यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. मुलगा बाहेर कामाला जातो. त्यांनी रहायला केलेले पत्र्याचे शेड शुक्रवारी दुपारी जळून खाक झाले.

घरातील सर्व साहित्याची राखरांगोळी झाली. या कुटुंबातील सदस्यांना शुक्रवारी सायंकाळी आपुलकीच्या सदस्यांनी भेट देऊन आस्थेने चौकशी केली. त्यानंतर शनिवारी सायंकाळी सांगोला येथील पत्रकार अरुण लिगाडे, आनंद (छोटू) दौडे व रविंद्र कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेख कुटुंबाला मदतीचा हात म्हणून दोन महिने पुरेल एवढे किराणा साहित्य, अंथरून – पांघरून व संसार उपयोगी भांडी देऊन सहकार्य करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिम कर, दिपक शिनगारे, सुरेशकाका चौगुले, राहुल टकले, प्रमोद दौडे, सुभाष फराटे, अरविंद डोंबे, वसंत सुपेकर, प्रा. विधीन कांबळे, अरविंदभाऊ केदार, शशिकांत येल- पले, दादा खडतरे, अनिल विभुते इंजि. हर्षल काळे आदी उपस्थित होते.