सांगोल्यात वासूद चौक ते कडलास चौकापर्यंत रिफ्लेक्टर बसविण्याची नागरिकांची मागणी

सध्या अनेक ठिकाणी अपघातांच्या प्रमाणात भरमसाठ वाढ होतानाचे चित्र दिसत आहे. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सांगोल्यात देखील अलीकडच्या काळात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सांगोला शहरातील सतत वर्दळीच्या सांगोला बसस्थानक, वासूद चौक ते कडलास चौक यादरम्यान रोडच्या मध्यभागी डिव्हायडर बसवले आहेत. त्या रोडवरील डिव्हायडरच्या वासूद चौक ते एसटी स्टॅन्ड समोर एसटी बसेसना आत प्रवेश करण्यासाठी रोडच्या मध्यभागी ते पेट्रोल पंप व तेथून हॉटेल मोहर ते कडलास चौकापर्यंत डिव्हायडरमधून पादचारी नागरिक, वाहनांना येण्या-जाण्यासाठी रस्ता सोडला आहे.

दरम्यान वासूद चौकापासून हॉटेल मोहोरपर्यंत रोडच्या मध्यभागी असलेले डिव्हायडर दिसून येत नसल्यामुळे वासूद चौक ते कडलास चौकापर्यंत दुचाकी, चारचाकी वाहने डिव्हायडरमध्ये अडकून सातत्याने अपघाताच्या घटना घडू लागल्या.
डिव्हायडरमध्ये वाहने अडकून वाहन मालकाचे नुकसान तर होतच आहे, परंतु वाहतुकीची कोंडीही होत आहे.


रस्त्यावर स्ट्रीट लाइटचीही सोय नाही वासूद चौकापासून ते कडलास चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा नगरपालिकेची स्ट्रीट लाइटची सोयही नसल्यामुळे या परिसरात अंधारात वाहनधारकांना रोडच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरचा अंदाज येत नाही आणि भरधाव वेगाने जाणारी वाहने सरळ डिव्हायडरवर चढून आवाज झाल्यावरच चालकाला कळते की, मध्यभागी डिव्हायडर आहेत, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वासूद चौक ते कडलास चौकापर्यंत रात्रीच्या वेळी रोडच्या मध्यभागी डिव्हायडर आहेत हे वाहनधारकांना समजण्यासाठी डिव्हायडरच्या दोन्ही बाजूला रिफ्लेक्टर बसवावेत अशी मागणी केली जाते आहे.