सांगोला येथे अंबिकादेवी यात्रेनिमित्त भरलेल्या जनावरांच्या बाजारात सव्वा दोन कोटींची उलाढाल

श्री. अंबिकादेवी यात्रेनिमित्त दि. ३० जानेवारी २०२५ ते दि. ०७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरलेल्या जनावरांच्या बाजारात १६५९ जनावरे खरेदी विक्रीमधून अंदाजे सव्वा दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती सभापती समाधान पाटील यांनी दिली. खिलार जनावरांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात झाली असून शुक्रवार दि.७ फेब्रुवारी रोजी यात्रेची सांगता झाली. श्री अंबिकादेवीचे यात्रेमध्ये दिनांक ३० जानेवारी २०२५ ते दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५ या कालवधीमध्ये भरलेल्या यात्रेतील जनावरांची खरेदी विक्री बाबतची माहिती पुढील प्रमाणे जनावरांचा प्रकार व कंसात विक्री नगः गाय (जर्शी) ३६२, गाय ( खिलार) ९, म्हैस (पंढरपूरी) २४१, बैल (खिलार) ६३५, शेळ्या (४१२). यावर्षी खिलार जनावरांची मोठी उलाढाल झाली. 

सांगोला यात्रेत भरणारा जनावरांचा बाजार खिलार बैलांसाठी राज्यभर प्रसिध्द आहे. बाजारात शर्यतीचे खोंड, वळू, शेती कामासाठी लागणारे बैल यासह खिलार जातीचे विविध प्रकारचे बैल पाहण्यास मिळाले. राज्यात बैलगाडी शर्यती सुरु असल्याने यंदा राज्यातील शर्यत शौकीन मोठ्या संख्येने खरेदीसाठी आले होते. यात्रेमध्ये जनावरे खरेदी करणेसाठी बेळगाव, जळगाव, पुणे, गुलबर्गा, बीड, लातुर, धाराशिव, अहिल्यानगर इ. भागातून व्यापारी आलेले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीने आलेली जनावरे शेतकरी व्यापारी व यात्रेकरु यांचेसाठी पिण्याचे पाणी व लाईटची सोई केलेली होती. सांगोला येथील यात्रेला चांगला प्रतिसाद लाभला. यात्रेत १५०० हून अधिक जनावरांची आवक आणि अंदाजे सव्वा दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान पाटील व उपसभापती माणिकचंद वाघमारे यांनी दिली.