सध्या अनेक भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. अवैद्य धंदे तसेच दिवसाढवळ्या चोऱ्या होऊ लागल्याने भीतीचे वातावरण आहे. सध्या अनेक फसवणुकीला सर्वसामान्य नागरिक बळी पडत आहेत. पण सध्या आटपाडीत काहीसा वेगळाच प्रकार उघडकीस येत आहे.आटपाडीच्या आठवडा शेळी- मेंढी बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये दर शनिवारी भरला जातो. यामध्ये सुमारे पाचशे ते सातशे चारचाकी वाहनातून व्यापारी व शेतकरी शेळ्या- मेंढ्या खरेदीसाठी येत असतात. माल खरेदी करून जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वाहनाला आटपाडीत अडवून त्यांच्याकडून सक्तीने आटपाडी पोलिस ठाण्याचे काही कर्मचारी हप्ते वसूल करत असल्याचा आरोप व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांकडून करण्यात आला.
याबाबत शनिवारी पत्रकार परिषदेत व्यापारी व संचालकांनी पोलिसांकडून होत असलेल्या लुटीबाबत आक्षेप नोंदवत नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, ज्येष्ठ संचालक सुबराव पाटील, माजी उपसभापती राहुल गायकवाड, सुनील तळे, शशिकांत जाधव,तर व्यापारी विशाल नलवडे, परवेझ मुल्ला, साबुद्दीन कसाई, लतीफ कसाई, काशीम मुल्ला, नजीर जमादार, असिफ खाटीक उपस्थित होते.
यावेळी व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या लुटीबाबतचा पाढा वाचला, दर शनिवारी आटपाडी करगणी रोड, आटपाडी दिघंची रोड, आटपाडी- सांगोला रोड, आटपाडी निंबवडे रोड, या रोडवर वाहतूक शाखेकडून नियुक्त दोन कर्मचारी व त्यांनी नियुक्त केलेले खासगी चार व्यक्ती या वसुली करत दमदाटी करत असल्याचा आरोप केला. जर पैसे नाही दिले, तर ऑनलाइन दंड करण्याची धमकी दिली जात असल्याचाही आरोप व्यापाऱ्यांनी केला.
सभापती संतोष पुजारी म्हणाले, खरसुंडी येथे मागील महिन्यात भरवलेल्या जनावरांच्या यात्रेमध्ये एका वाहनाकडून ३०० ते ४०० रुपये वसुली पोलिसांच्या वाहतुकीच्या एका कर्मचाऱ्याने केली आहे. याबाबत त्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी यातील रक्कम आम्हाला वरिष्ठांना द्यावी लागत असल्याचे सांगितल्याचाही आरोप सभापती संतोष पुजारी यांनी केला. वसुली बाबत त्रास दिल्यास पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे.