इस्लामपूरात जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाअंतर्गत चिमुकलीस जीवदान!

जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानने ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील श्रावणी चांदणे या चिमुकलीस दिले जीवदान. तिच्या हृदयास छिद्र होते आणि ही शस्त्रक्रिया करण्याची त्यांची ऐपत नव्हती. अभियानने माजी मंत्री आ. जयंतराव पाटील, युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या सहकार्याने मुंबई येथील एसआरसीसी हॉस्पिटलमध्ये श्रावणींच्या हृदयाची मोफत व यशस्वी शस्त्रक्रिया केली.आ. जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथे श्रावणीच्या प्रकृतीची आस्थेवाईक चौकशी करून चांदणे कुटुंबास धीर दिला.

यावेळी राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, राजारामबापू सहकारी बँकेचे संचालक अशोक पाटील डॉ. हणमंत पाटील, अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे, विभागीय संघटक शशिकांत वायदंडे प्रामुख्याने उपस्थित होते.ऐतवडे खुर्द येथील अक्षय चांदणे, नीलम चांदणे यांच्या संसारवेलीवर तब्बल ६ वर्षांनी श्रावणी नावाचे फुल उमलले. चांदणे कुटुंबात आनंद ओसंडून वाहू लागला.

मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण श्रावणी जन्मतःच अशक्त होती. तिची प्रकृती सारखी बिघडायला लागली. आई-वडिलांनी तिला सांगली, कोल्हापूर येथील डॉक्टरांना दाखविले उपचार घेतले. मात्र फारसा फरक पडला नाही. मुंबई येथील ग्यान्मार्क व रिलायन्स हॉस्पिटलमध्ये मुलीच्या हृदयास छिद्र असून मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार, यास रुपये चार लाख येणार असल्याचे सांगितले.

यावेळी चांदणे कुटुंबाचे आभाळच फाटले. मात्र राजारामबापू सहकारी बँकेचे संचालक अशोक पाटील, डॉ. हणमंत पाटील यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी अभियान चे समन्वयक इलियास पिरजादे, विभागीय संघटक शशिकांत वायदंडे यांच्या कानावर ही बाब घेतली.

त्यांनी आ. जयंतराव पाटील, प्रतिकदादा पाटील यांच्या सहकार्याने यंत्रणा लावली आणि मुंबई येथील एसआरसीसी हॉस्पिटलमध्ये श्रावणीच्या हृदयाची मोफत, यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. चांदणे कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला.