कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद मातोश्रीवर मिटणार

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निर्माण झालेली अंतर्गत कुरघोडी, जिल्हाध्यक्ष पदावरून सुरू असलेली रस्सीखेच आणि त्यामुळे निर्माण झालेला ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद मातोश्रीवर पोहोचला आहे.त्यामुळे पक्षाची नाहक बदनामी होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हा अंतर्गत वाद मिटवण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या बैठकीत पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी करत जिल्हाध्यक्षपदाचा चेहरा ठरवला जाणार आहे. 14 ते 15 फेब्रुवारी दरम्यान मातोश्रीवर कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून अंतर्गत वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकेकाळी सहा आमदार आणि दोन खासदार असलेल्या या जिल्ह्यात शिवसेनेच्या दुफळीनंतर ठाकरे गटाला घरघर करण्याची वेळ आली आहे. त्यात ठाकरे गटातील अंतर्गत वाद हा पक्ष नासवण्यासाठी जबाबदार ठरत आहे.