धक्कादायक! सोलापूर पोलिस मुख्यालयामध्ये सेवा बजावणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या

सध्या अपघात बरोबरच आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. सोलापूर पोलिस मुख्यालयामध्ये सेवा बजावणारे महेश ज्योतीराम पाडुळे यांनी अज्ञात कारणावरून बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वैराग येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.वैराग पोलिसांमध्ये आकस्मिक मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे. माढा तालुक्यातील अंजनगावचे मूळ रहिवासी असलेले महेश पाडुळे (वय ४५) हे वैराग पोलिस ठाण्यामध्ये रुजू झाल्यानंतर कुटुंबासह वैराग येथे राहत होते.

त्यानंतर त्यांची बदली सोलापूर मुख्यालय येथे झाली होती. दरम्यान, १२ फेब्रुवारी रोजी बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. त्यांना वैराग येथील वैराग मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबतची खबर डॉ. सागर शिंदे यांनी पोलिसात दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक सहा वर्षांचा मुलगा, एक आठ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव हे करीत आहेत.