क्रांतिवीर नागनाथ अण्णा, आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सर्वसामान्य जनतेच्या सहभागातून पाणी परिषदेने चिवट लढा दिला. कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना झाली. २०१४-१५ मध्ये आटपाडी आणि सांगोला तालुक्यांत कृष्णेचे पाणी आले. टेंभू, म्हैसाळ, ताकारी प्रकल्पांचे पाणी तलाव, नदी, ओढ्यांमध्ये आले आहे. प्रत्येकाच्या शेतात पाणी पोहोचणे आवश्यक आहे. शेवटच्या घटकापर्यंत म्हणजेच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी चळवळीमार्फत सरकारदरबारी पाठपुरावा सुरू आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी सुरू केलेली पाणी परिषद २६ जून रोजी होणार आहे. यंदाची ही ३२ वी पाणी परिषद आहे. आटपाडी, सांगोला, मंगळवेढा, जत तालुक्यांतील जनतेची ही परिषद आहे. या परिषदेत शेतकरी आणि कष्टकरी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन निमंत्रक वैभव नायकवडी आणि चळवळीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी केले.
दुष्काळाशी सामना करणाऱ्या जनतेला कृष्णा खोऱ्यातून हक्काचे पाणी देण्यासाठी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी १९९३ मध्ये पहिली पाणी परिषद आयोजित करून लढा सुरू केला. आटपाडी तालुका केंद्रबिंदू मानून सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील १३ दुष्काळी तालुक्यांना पाणी देण्याची चळवळ गेली ३१ वर्षे अविरतपणे सुरू आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कृष्णा खोऱ्यातील १३ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील जनतेची ३२ वी पाणी परिषद सांगोला येथे आयोजित करण्यात आली आहे.