सध्याच्या काळात तर चोरी दिवसाढवळ्या होऊ लागल्याने चिंतेचे वातावरण असताना फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ होऊ लागली आहे. याला सर्वसामान्य जनता बळी पडत आहे. एकूणच काय तर गुन्हेगारी प्रवृत्तीत दिवसागणिक वाढ होऊ लागली आहे. हातकणंगले तालुक्यात असा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे ज्यामुळे प्रश्न चिन्हच निर्माण झाले आहे. हातकणंगले तालुका कृषी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने तब्बल सहा वर्षे नियमबाह्य वेतनवाढ घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सूर्यकांत लक्ष्मण माने असे या लिपिक कर्मचाऱ्याचे नाव असून ते हातकणंगले तालुका कृषी कार्यालयात लिपिक आहेत. शिपाई ते लिपिक असा त्यांचा प्रवास झाला असून त्यांनी २०१३ ते २०१९ या कालावधीत नियमबाह्य वेतनवाढ घेतल्याचे आढळून आले आहे. वेतनवाढीसाठी विभागाची अंतर्गत सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
मात्र, माने ही परीक्षा उत्तीर्णच झाले नाहीत. परंतु, तरीही त्यांनी तब्बल सहा वर्षे वेतनवाढ घेतल्याने त्यांना नेमका कुणाचा वरदहस्त होता, याचीच सध्या चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे माने यांची ही नियमबाह्य वेतनवाढ २०१९ ला कृषी विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर ती थांबवण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत याची वसुली केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कृषी कार्यालयांचे प्रत्येक वर्षी लेखापरीक्षण होते. यात खुट्ट वाजले तरी लेखापरीक्षकांना ते कळते. मात्र, एखादा कर्मचारी तब्बल सहा-सहा वर्षे सरकारच्या लाखो रुपयांच्या पैशांवर डल्ला मारत असताना ही चूक कशी दिसली नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
माने यांचा हा प्रकार गेल्या तीन महिन्यांपूर्वी एका सामाजिक कार्यकर्त्याने माहिती अधिकारात उघडकीस आणला. मात्र, तरीही माने यांच्यावर कारवाई करण्यास कृषी विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यांना नियमबाह्य पद्धतीने वेतनवाढ देताना तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली नाही का, की डोळे बंद करून वेतनवाढ दिली, असे सवाल आता उपस्थित होत आहेत.
हातकणंगले कृषी कार्यालयातील पाच वर्षांच्या डायऱ्याच मंजूर नाहीत. मात्र, तरीही कृषीप्रमुखांनी डिझेलची बिले मंजूर करून घेतल्याची कुजबुज सुरू आहे. कृषीचे प्रमुख कुठे व किती कि.मी. वाहनांनी फिरले याच्या नोंदीच नसताना त्यांची लाखो रुपयांची बिले कशी काय मंजूर झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.