कोव्हिडमुळे निधन झालेल्या व्यक्तींची कर्जमाफी व्हावी, यासाठी सोमवारी ता. १ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता पंचगंगा नदीत कोणत्याही ठिकाणी गनिमी काव्याने शेकडो कार्यकर्त्यांसह महिला पदाधिकारी उड्या मारून जलसमाधी आंदोलन करणार असल्याची माहिती लोकसेवा महासंघ महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्यावतीने देण्यात आली आहे.
कोव्हिडमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींपैकी काहींनी गृह कर्ज, शेतीचे कर्ज, क्रेडिट कार्ड लोन आधी विविध प्रकारचे कर्ज घेतले होते. या कर्जाचे हप्ते मयत व्यक्तींचे काही कुटूंब आजही भरत आहेत, तर काही वारसांना स्वतःचा उदरनिर्वाह चालवणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे बँकेचे हप्ते भरणे अशक्यप्राय झाले आहे.
या लोकांनी स्वतःचे राहते घर बँकांना, संस्थांना तारण म्हणून दिलेले आहे. संबंधित बँका आणि पतसंस्थांनी मृत कर्जदारांच्या कुटूंबियांना मालमत्ता जप्तीच्या नोटीसा दिलेल्या आहेत. बँका, पतसंस्थांनी राहते घर जप्त केल्यास अनेकांवर बेघर होण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे अश्या कर्जदारांच्या वारसदारांना आत्महत्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
त्यामुळे हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती लोकसेवा महासंघाचे संस्थापक राज्य अध्यक्ष उत्तम कागले यांनी दिली. यावेळी महिला आघाडीच्या नम्रता सुतार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा का मोटण्णावर, जिनेंद्र पत्रावळी, जिल्हा कार्याध्यक्ष विकास पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.