सध्या अनेक भागात गुन्हेगारी प्रकारात खूपच वाढ झालेली आहे. राजेरोसपणे अवैद्य धंदे सुरु असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे दिसतच आहे. विटा येथे एमडी ड्रग्ज सापडल्याने देखील नागरिकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. जनतेतून नाराजीचा सूर उमटत आहे. अशातच विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, तसेच विटा शहरातील गुन्हेगारी आणि अवैद्य व्यवसाय मोडून काढा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून गुन्हेगारी मोडीत काढू, असा खणखणीत इशारा विटा शहरातील शेकडो नागरिकांनी गुरूवारी प्रशासनाला दिला. विटा येथील जिओ न्यूज चॅनेल या यूट्यूब चैनल चे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर मंगळवारी रात्री कोयता आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात प्रसाद पिसाळ यांच्यासह त्यांच्या सहकर्मचारी सुषमा जोशी या देखील जखमी झाल्या. या घटनेचे संतप्त पडसाद संपूर्ण सांगली जिल्ह्यात उमटले. गुरुवारी विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी या मागणीसाठी तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी वैभव पाटील म्हणाले, विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येताना प्रत्येक वेळी आम्ही कोणाला तरी चांगल्या कामासाठी पाठिंबा देण्यासाठी येतो. मात्र, आज गुन्हेगारी, अवैध्य व्यवसाय संपवण्याची मागणी करण्यासाठी रस्त्यावर यावे लागते ही नक्कीच लज्जास्पद गोष्ट आहे. पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो.
तसेच विटा शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सर्वांनीच आता एकत्र येणे गरजेचे आहे असे मत वैभव पाटील यांनी व्यक्त केले. माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी पत्रकार हल्ला प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी धिंड काढावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून त्यांची धिंड काढू. पत्रकार हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांनी निर्भीडपणे काम करावे यासाठी आम्ही भाजपचे सर्व पदाधिकारी आपल्या पाठीशी उभे राहू, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर, सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील सुतार, संदीप ठोंबरे, चेअरमन विनोद गुळवणी, दत्तकुमार खंडागळे यांच्यासह पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना गुन्हेगारांवर कठोर कारवाई संदर्भात निवेदन देण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी या गुन्हेगारांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची ग्वाही यावेळी बोलताना दिली.