आष्टा शहरातील राजकीय वातावरण निवडणुकीआधीच तापले, राष्ट्रवादी व भाजपामधील श्रेयवाद उफाळला

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय उलथापालथ झालेली सर्वानीच अनुभवली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले. आष्टा नगरपालिकेची ६ डिसेंबर १८५३ ची स्थापना. सध्याची इमारत दुमजली होती. कामकाजच्या दृष्टीने प्रशासन व सदस्य मंडळासाठी इमारत अपूर्ण पडत होती. त्यासाठी मुळच्या इमारती वरतीच नव्याने तिसरा मजला उभारण्यात आला आहे. स्वतंत्र विभाग प्रशस्त करण्यात आले आहेत. जुन्या इमारतीमधील सभागृहाला काकासाहेब शिंदे नामकरण होते. सभागृह आता तिसऱ्या मजल्यावरती करण्यात आले आहे.

नव्या सभागृहाला धर्मवीर संभाजी महाराज यांचे नाव द्या, अशी भाजपाची मागणी होती. मात्र जुन्या इमारतीतील सभागृहाला काकासाहेब शिंदे नाव होते. नगरपालिकेवरती प्रशासक राज आहे. मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई हे गेल्या एक महिन्यापासून रजेवर गेल्याने सध्या नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून इस्लामपूरचे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन काम पाहत आहेत. शनिवारी पालिकेत पंचवीस वर्षे सत्तेत असलेल्या आष्टा शहर विकास आघाडीकडून तासगावचे आमदार रोहित पाटील यांच्याहस्ते व आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या सभागृहाचे काकासाहेब शिंदे सभागृह असे नामकरण करीत फलक लावण्यात आला.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील, विशाल शिंदे यांच्यासह शिंदे व पाटील गटाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सभागृहाचे उद्घाटन झाल्याची माहिती मिळताच भाजपा कार्यकर्त्यांनी पालिकेत जाऊन याच सभागृहाचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृह असे नामकरण करून तसा फलक सभागृहात लावला.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते सतीश बापट, संदीप गायकवाड, दादा वाघमारे, व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाशिवाय एकाच सभागृहाचे दोन गटाकडून वेगवेगळी नावे देत नामकरण झाल्याने निवडणुकीआधीच शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून संघर्षाच्या टप्प्यावर येत आहे.