आष्टा येथील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेवर एका युवकाने चाकू हल्ला करून त्यांना जखमी केले. आष्टा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. रेश्मा दिगंबर मानेअसे जखमी महिलेचे नाव आहे. प्रफुल्ल भाऊसाहेब काटे, पंकज भाऊसाहेब काटे, सिद्धार्थ शामराव कांबळे, स्वप्नील शामराव कांबळे व तेजू पंकज काटे अशी संशयितांची नावे आहेत. मंगळवारी रेश्मा माने यांचा भाचा नितीन हा ‘बहिणीला का त्रास देतोस’ अशी विचारणा करायला संशयित प्रफुल्ल काटेकडे गेला होता.
यावेळी त्यास संगनमत करून संशयितांनी शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी नितीन यास त्यांच्यापासून सोडवण्यासाठी रेश्मा तेथे गेल्या. यावेळी त्यांनाही संशयितांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. संशयित प्रफुल्ल काटे याने त्यांच्यावर चाकू हल्ला केला. यात त्यांच्या मनगटावर जखम झाली. याबाबत रेश्मा माने यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
