इचलकरंजीतील उद्यानात नवीन खेळणी बसविण्याचे काम पूर्ण,बालगोपाळांसह पालकवर्गात समाधान

सध्या इचलकरंजी शहरात अनेक विकासकामे सुरु आहेत. रस्ते, वाहतूक, पाणी, अवैद्य धंदे याबाबतीतील अनेक समस्या प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.शहरात महानगरपालिकेच्या शहिद भगतसिंग उद्यान, राणीबाग तसेच सुंदर बागेतील बहुतांश खेळणी पूर्णपणे खराब झाली होती तर काही मोडकळीस आली होती. यामुळे उद्यानात येणाऱ्या मुलांना याचा धोका निर्माण होण्याची भिती पालकवर्गातून व्यक्त केला जात होती. उद्यानातील खेळणी खराब झाल्याने मुलांना खेळण्याची कोणतीच साधने नव्हती. त्यामुळे माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी आम. सतेज पाटील यांना स्थानिक विकास निधीतून उद्यानातील खेळणी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आम. सतेज पाटील यांनी २५ लाखाचा निधी दिला होता.

त्यानंतर महापालिकेने निविदा काढली. संबंधित मक्तेदाराने आधुनिक प्रकारची तसेच दर्जेदार खेळणी बसविली  आहेत. भगतसिंग उद्यानात ९ लाख ३३ हजार, राणी बाग तसेच सुंदर बागेत प्रत्येकी ८ लाख १३ हजार ३२२ रूपयांची खेळणी बसविण्यात आ आहेत. खेळणी बसविण्याचे काम पूर्ण झाले असले तरी खेळण्याभोवताली वाळू पसरण्यासह काही किरकोळ कामे राहिली असल्याचे दिसते. त्यानंतर या खेळण्यांचा वापर सुरू करण्यात येणार आहे. आम. सतेज पाटील यांच्या विकास निधीतून शहिद भगतसिंग उद्यान, राणीबाग आणि सुंदर बागेत नवीन खेळणी बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीपूर्वीच खेळणी बसविण्याचे काम पूर्ण झाल्याने शहरातील बालगोपाळांसह पालकवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.