आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सध्या सिनेमागृहात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपट सध्या प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहे. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत असलेला हा चित्रपट बघून अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत.
चित्रपट बघून प्रेक्षक भारावून जाताना दिसताहेत. छावा चित्रपट बघितल्यानंतर एक ५-६ वर्षांचा चिमुकला रडताना दिसत आहे. अश्रूंना वाट करून देतच तो ‘गजअश्वपती… भूपती प्रजापती… सुवर्णरत्न श्रीपती… अष्टवधान जागृत…. अष्टप्रधानवेष्टित… न्यायालंकारमंडित… शस्त्रास्त्रशास्त्र पारंगत… राजनितिधुरंधर… प्रौढप्रताप पुरंदर… क्षत्रियकुलावतंस….. विकी कौशलने शेअर केला होता सिंहासनाधिश्वर… महाराजाधिराज… राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो’, असे म्हणत आहे.
छावा चित्रपट बघून प्रेक्षक रडत असल्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही बघितले असतील. यात एका लहान मुलाचा व्हिडीओही खूपच व्हायरल होत आहे. हाच व्हिडीओ पोस्ट करत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक भावूक पोस्ट केली आहे. ‘छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा या पिढीत खोलवर रुजूतेय याचे समाधान वाटतेय’, असेही जयंत पाटलांनी म्हटले आहे.
या मुलाचा व्हिडीओ शेअर करत जयंत पाटील यांनी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, या दाटलेल्या भावना, अश्रूभरल्या डोळ्यांच्या कडा आणि इतक्या लहान वयातील संवेदनशीलता पाहून मन भरून आले. छावा चित्रपट अद्याप पाहिलेला नाही, पण छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा या पिढीत खोलवर रुजूतेय याचे समाधान वाटतेय.
या चिमुकल्याचा व्हिडीओ छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशलनेही शेअर केला होता. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत विकी कौशलने म्हटले होते की, आमची सर्वात मोठी कमाई! बाळा, तुझा अभिमान वाटतो. तुला मिठी मारावी वाटतीये. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि भावनांबद्दल खूप खूप आभार. जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घरात शंभूराजांची कहाणी पोहोचावी, ही आमची इच्छा होती.