अलीकडच्या काळात चोरीच्या प्रमाणात भरमसाठ वाढ होऊ लागली आहे. दिवसाढवळ्या होत असलेल्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. हुपरी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दारात लावलेल्या मोटारसायकल लंपास करण्याचे प्रमाण वाढले आहे. यळगूड येथील अंबाई नगरमध्ये दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या असून एका कारागीराच्या घरातील कामांची चांदी लंपास केली तर अशोक गुरुलिंग कोळी यांच्या घरातून २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याच नगरात भाऊसाहेब सावंत यांच्या घरातून इतर उद्योजकांकडून कामांसाठी आणलेली सुमारे १५ किलो चांदी लांबविल्याने गोरगरीब कारागिरांची पंचाईत झाली आहे तर बंद घराचे कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करीत घरात शोधाशोध केली व तिजोरीचे कुलूप तोडून आतील साहित्य विस्कटून टाकले व आतील ५ तोळे सोन्याचे गंठण (किंमत १ लाख १३ हजार ५४७ रुपये), ९ ग्रॅम सोन्याचे टॉप्स (५० हजार) व ३ ग्रॅम सोन्याची अंगठी (३० हजार) असा २ लाख ४९ हजार ५४७ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.