हातकणंगलेत मिनी पोलिसांकडूनच व्यावसायिक, वाहनधारकांची लुटमार सुरू

सध्याच्या काळात गुन्हेगारीच्या प्रकारात खूपच वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यामुळे सर्वत्र भीतीच दिसून येत आहे. हातकणंगलेत देखील गुन्हेगारी तसेच फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ दिसू लागली आहे. पण अलीकडे तर मिनी पोलिसांकडूनच लूटमार सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. पोलिसांची अपुरी संख्या आणि हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढलेले अवैध धंदे, गुन्हेगारी यावर नियंत्रण रहावे यासाठी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी हातकणंगले पोलीस ठाण्याकडे काही होमगार्ड नियुक्त केले आहेत.

परंतू, ज्या कामासाठी हे होमगार्ड नियुक्त केले आहेत. त्यापेक्षा त्यांच्या उचापतीच अधिक वाढलेल्या आहेत असे अलीकडच्या काळात दिसून येत आहे. अंगातील असलेल्या खाकीच्या आधारावर त्यांनी चांगलीच दहशत निर्माण केली आहे. रस्त्यावर वाहने अडविणे, तपासणी करणे, हॉटेल, लॉजिंगमध्ये बसून दमदाटी करणे, रामलिंग, चिंद्यापीर परिसरात फेरफटका मारत नवदांपत्य, कॉलेज युवक- युवतींची वाहने अडवून तपासणी करणे आदी प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. हा प्रकार वाढत असल्यामुळे यांच्यावर कोणाचे नियंत्रण आहे का ? अशी विचारणा होत आहे.

हातकणंगले पोलीस ठाण्याकडील होमगार्ड अर्थात मिनी पोलिसांनी खाकीचा आधार घेत व्यावसायिक, वाहनधारकांची दिवसा ढवळ्या लुटमार सुरू आहे. पोलिसांपेक्षा त्यांचाच रूबाब वाढल्याने लोक वैतागले आहेत. पोलीस निरीक्षक शरद मेमाने ही बाब गांभीर्याने घेणार का? असा संतापजनक सवाल उपस्थित होत आहे.